१ दिवस, २२ किलोमीटर, १ किल्ला आणि महाराष्ट्रातील २ उंच शिखरे: शिरपुंजे भैरवगड, घनचक्कर, गवळदेव

पुण्यावरून निघून रात्रभर प्रवास करून पहाटे साडेतीनच्या दरम्यान आम्ही शिरपुंजे या गावातील एका ग्रामस्थांच्या घरी पोहोचलो. आजूबाजूचे गर्द जंगल, अंधार आणि परिसरात वावर असलेले हिंस्र प्राणी यामुळे आम्ही गाडीमध्येच झोपून राहिलो.

साधारण पहाटे पाचच्या दरम्यान गाडीतून उतरून फ्रेश झालो, नाष्टा केला आणि शिरपुंजाचा भैरवगड या आमच्या पहिल्या ट्रेक कडे प्रस्थान सुरू केले. शिरपुंजाचा भैरवगड हे त्या परिसरातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत. त्या दिवशी रविवार होता. रविवारी खंडोबाचे दर्शन होणे माझ्यासाठी एक अलभ्य लाभच.दोन महिन्यांपूर्वी इथे जत्रा झाली होती. जंगलातील हिरव्या झाडीमध्ये पिवळ्या, पांढऱ्या, केशरी रंगांनी सुशोभित केलेले प्रवेशद्वार खुलून दिसत होते.  


प्रवेशाच्या पायऱ्यांनी पुढे आमचा ट्रेक चालू झाला काही ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या, तर काही ठिकाणी अंगावर येत असलेली चढण यामुळे सकाळच्या गारव्यात देखील घाम फुटत होता. संपूर्ण ट्रेक हा चढणीचाच होता. आम्ही पुढे सरकत होतो. आजूबाजूचा परिसर आणखीनच मोहक वाटतो आणि पुढे काय आहे ? या कुतूहलतेने आम्ही आपोआपच गड सर करू लागलो.

आम्ही निमुळत्या खिंडीत पोहचलो. खिंडीत पोचल्यावर डाव्या बाजूला भैरवगडाकडे जाणाऱ्या पायऱ्या तर उजव्या बाजूला घनचक्कर कडे नेत असलेला लोखंडी पायर्यांनी लक्ष वेधून घेतले.


आम्ही डाव्या बाजूला असलेल्या भैरवगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. भैरवगडाची उंची समुद्रसपाटीपासून ११४५मी. जवळपास २५०० वर्षे जुना असा हा किल्ला. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी, खांब टाकी, भैरोबाचे मंदिर, वीरगळी, गडावरून दिसणारे कळसुबाई च्या कुशीत वसलेले इतर किल्ले, घनचक्कर, गवळदेव यासारखे ठिकाणी सहज नजरेस पडतात. वातावरणामध्ये धुक असल्याकारणाने किल्यांच्या रांगा तितक्या स्पष्ट दिसत नव्हत्या. जरा डोळे मोठे करून या सर्व रांगा आणि कळसुबाई शिखराचे सोबती पाहण्याचा प्रयत्न मात्र मनापासून चालू होता. 


भैरवगड या किल्ल्यावर अनेक अवशेष आहेत. माथ्यावर दोन मोठ्या गुहा आहेत ज्या एका गुहेत भगवान भैरवनाथाचे मंदिर आहे, तर  दुसरी गुहा निवासासाठी वापरली जाते.

गुहेतील मूर्ती अतिशय उत्तम कोरीव रंगकाम केलेली असून गावकऱ्यांनी तिची देखभाल केली आहे.

जराशी विश्रांती घेऊन आम्ही गड पाहण्यासाठी निघालो. प्रचंड मोठे पठार, पाण्याची टाकी त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे खांब टाक, इथे म्हणजे  थांब टाक्यांमध्ये आम्हाला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळालं.  त्यानंतर पुढे जाता तिथे अनेक विरगळ पाहायला मिळाल्या. एका गुहेत भैरोबाचे मंदिर आहे.  गुहेमध्ये असलेल्या भैरवाची मूर्ती साजेसी आणि आकर्षक आहे.  भैरोबाचे दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. समोरच्या बाजूलाच आणखीन एक भली मोठी विरघळ बघण्यास मिळाली. नीट पाहिले असता असे दिसते की त्यावर चंद्र आणि सूर्य शिळे मध्ये कोरलेले आहेत.तसेच वरच्या बाजूला दोन कोरलेली फुले, हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेला वीर लढत आहे. किंबहुना त्याच्या चेहऱ्यावरील भाव देखील अनोखे आहेत. 



सकाळी आठच्या सुमारास आम्ही तिथून परतीला निघालो.आम्हाला  पुढे अजून बराच पल्ला गाठायचा होता. त्याच खिंडीत उतरलो. आता समोर असलेल्या घनचक्कर कडे नेत असलेल्या जिन्यावर आम्हाला चढायचे होते. लोखंडी जिन्याचा आधार घेत आम्ही घनचक्कर चा रस्ता पकडला. विस्तृत पसरलेले पठार, कारवीची कमरे इतकी वाढलेली झाडी आणि कळसुबाईच्या कुशीतील दूर दूर पसरलेल्या डोंगर रांगा यामुळे आपण काहीतरी विलक्षण करतोय असे पदोपदी भासत होते. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही एका घनदाट जंगलामध्ये प्रवेश केला.  इथे नक्कीच मोठा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यामध्ये वाहत असावा अशा काही खुणा त्या तिथे  स्पष्ट दिसत होत्या. त्याच ठिकाणी आम्ही थोडावेळ थांबलो विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा घनचक्कर कडे चालायला लागलो. काही वेळातच आम्ही घनचक्करच्या माथ्यावर पोहोचलो.





समुद्र सपाटीपासून साधारण १५३२ मीटर उंचीवर आम्ही होतो. तिथून मुडा, रतनगड यांसारखे सह्यसोबती  जवळ भासत होते. घनचक्कर हे कळसुबाईच्या रांगेतील एक सुंदर असे हे शिखर. तिथे थोडावेळ थांबलो खोल असलेल्या भव्य दरीचा आनंद घेतला. सुरक्षिततेचे भान ठेवून काही फोटो काढले. थोडीशी पूजा देखील केली. अकरा वाजले होते. आता आम्हाला आमचे उद्दिष्ट गाठायचे होते ते म्हणजे गवळण. काही वेळातच आम्ही गवळदेवसाठी  निघालो. 


हिवाळा असला तरी आता ऊन डोक्यावर येत चालले होते. आम्हाला गवळदेव कडे जाण्यासाठी पूर्ण घनचक्कर उतरून खिंडीत उतरलो. उतरून समोर असलेल्या गवळदेव शिखराच्या डाव्या बाजूची म्हणजेच दरीच्या बाजूकडील वाट धरली. शिखर जरी समोर दिसत असले तरी संपूर्ण वेढा घालून मागच्या बाजूने माथा गाठायचा होता.  गवळदेव हे १५२२ मीटर उंची असलेले हे महाराष्ट्रातील तीन क्रमांकाचे उंच शिखर. उंची गाठायला मेहनत ही तितकीच! 



घनचक्करचा डोंगर डाव्या हाताला ठेवून आम्ही गवळदेव ला पूर्ण ट्रॅव्हर्स  मारून त्याच्या मागच्या बाजूला गेलो. शिखराच्या ट्रेक रूटवर आम्हाला फक्त एकमेव पानवठा दिसला. त्यापाणवठ्याच्या  बाजूला असलेल्या चिखलात प्राण्यांच्या पंजाचे ठसे उमटले होते. त्यावरून त्या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे हे स्पष्ट कळून येत होते आणि पाणी प्यायला सर्व पशु याच ठिकाणी येत असावेत यात काही शंका नव्हती. त्यात आमचा देखील सहभाग होता. गवळदेव - महाराष्ट्रातील कमी ज्ञात आणि ऑफबीट शिखर… ४५६६ फूट उंचीवर असलेले काळसुबाई नंतरचे अधिकृतपणे तिसरे सर्वोच्च शिखर तुम्हाला भंडारदरा प्रदेश आणि आजूबाजूच्या पर्वतांचे संपूर्ण विहंगम दृश्य माथ्यावरून घडवते. 


अवघ्या  दोन तासाच्या डोंगरयात्रेनंतर आम्ही गवळदेव च्या झेंड्यापाशी नेणाऱ्या चिंचोळ्या वाटेवर पोहचलो. काहीसा दगडांचा आधार घेऊन जरासे क्लाइंबिंग या ठिकाणी अनुभवायची संधी मिळाली. तो लहान टप्पा पार करून पुन्हा एकदा छोटीशी टेकडी ओलांडायची होती. पावलं आता झपझप पडत नव्हती.  मात्र मन पळत होत. पांढऱ्या झेंड्याकडे प्रस्थान करून अखेर गवळदेवाच्या मंदिरासमोर आम्ही नतमस्तक झालो. गवळदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे या देवाला शेंदूर लावत नसून चुना लावतात आणि त्यामुळे अगदी दुर्मिळ अशी गवळदेवाची मूर्ती पाहायला मिळाली.


दुपारचा एक वाजला होता जेवढे अंतर आम्ही परत आलो होतो तितकेच आम्हाला पुन्हा परत जायचे होते म्हणजे साधारण बारा किलोमीटर एक मार्गी प्रवास झाला होता आणि तितकाच प्रवास पुन्हा जाताना करायचा होता. वेळेचे भान ठेवून आम्ही अवघ्या काही मिनिटात मध्येच आमचा आनंद तिथे साजरा केला. जवळ देवाच्या माथ्यावरून अग्निबाण या कात्राबाईच्या कुशीतील सुळक्याचे, रतनगड, हरिश्चंद्रगड या भव्य किल्ल्यांचे दर्शन झाले.


संध्याकाळी ५. ३० वाजता आम्ही पुन्हा शिरपुंजे गावात आलो आणि जेवणावर ताव मारून परतीच्या प्रवासाला निघालो.

लेख आणि फोटो आवडले असल्यास तुमच्या ट्रेक करणाऱ्या मित्र परिवारास आवश्यक शेअर करा.आमच्या ट्रेक मध्ये सहभागी होण्याकरिता www.gtribe.in या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा 7588592020 | 7588492020

कोकणकडा रॅपिल्लिंग चा थरार साहसी अनुभव वाचण्यासाठी इथे क्लिक करा



Comments